Advertisement

Breaking News
Loading...

● महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी ४५ एकर जमीन न दिल्यास जनआंदोलन... ● बसवेश्वरांची अवहेलना चालणार नाही : डाॅ.बसवराज बगले...

 


मंगळवेढा | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मंगळवेढ्यातील १५ एकर जमीन देण्याची एकतर्फी घोषणा पालकमंत्र्यांनी केली आहे ही एक प्रकारे बसवेश्वरांची अवहेलना आहे,त्याऐवजी कृष्ण तलावासह ४५ एकर जागा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ पाठवावा अन्यथा ' जनआंदोलन ' छेडण्यात येईल असा इशारा स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ.बसवराज बगले यांनी दिला आहे.

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मंगळवेढ्यातील स्मारकाबाबत प्रशासनाचा चाललेला खेळखंडोबा आणि बसवप्रेमींची अवहेलना यापुढे लिंगायत समाज सहन करणार नाही, या विषयी येत्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा शासनाला लक्षवेधीद्वारे जाब विचारण्यात येईल असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जगात सर्वप्रथम मंगळवेढ्यात लोकशाही मूल्यांची मुहूर्तमेढ केलेले थोर समतावादी संत महात्मा बसवेश्वर महाराजांच्या स्मारक निर्मितीची घोषणा २०१६ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.मागील १० वर्षात प्रत्येक अधिवेशनात हा विषय लोकप्रतिनिधींकडून चर्चिला गेला आणि सरकारकडून खोटी आश्वासने दिली गेली,मात्र एकाही घोषणेची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली नाही. त्यामुळे लिंगायत समाजासह बसवेश्वर भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या वतीने या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी योग्य असलेली मंगळवेढ्यातील शासकीय जमीन स्मारक समितीकडे वर्ग करावी,यासाठी सतत पाठपुरावा केला,त्यानुसार कृष्ण तलावासह ४५ एकर जमीन तलावासह वर्ग करण्याचा प्रस्ताव प्रांताधिकारी यांनी मार्च २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे.मात्र सत्ताधारी भाजपची अनास्था आणि प्रशासनाच्या अज्ञानामुळे हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात गेली ४ वर्षे दिरंगाई होत आहे.

स्मारक कृती समितीच्या वतीने अध्यक्ष डाॅ.बसवराज बगले आणि पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा भेटून पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाला गती देण्याची सूचना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना केली आहे.मात्र पालकमंत्र्यांनी कृती समितीला आणि समाजबांधवांना विश्वासात न घेता या " आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी फक्त १५ एकर जमीन " देण्याची घोषणा केली आहे.हा लिंगायत समाजासह बसवेश्वर भक्तांचा खूप मोठा अपमान आहे.

....आश्वासनांचा हवेत गोळीबार....

मंगळवेढा तालुक्यातील नंदूरच्या कार्यक्रमात तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी शासकीय जमीन दिली आहे आता लागेल तेवढा निधी देऊ,अशी घोषणा केली. त्यांनंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी स्मारकाचा विषय महिन्याभरातच मार्गी लावू अशी हमी दिली होती.नंतर मार्च २०२५ मध्ये मुंबईतील अर्थ संकल्पीय अधिवेशनात सताधारी आमदारांसह विरोधी आमदारांनी स्मारक निर्मितीबाबत लक्षवेधी करून शासनाला जाब विचारला,त्यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिन्यात स्मारकाच्या कामाला सुरूवात केली जाईल असे आश्वासन दिले.वर्षभरात काहीच झाले नाही.नेमके काय करायचे याचे कोणालाही ज्ञान नाही,केवळ कागदी घोडे नाचवून स्मारकासंदर्भात अवहेलनाच करण्यात येत आहे.

यंदाच्या बसवजयंती दिनी मध्यरात्री सोलापुरात येऊन महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासमोर हजारो समाज बांधवांच्या साक्षीने स्मारकासाठी १५ एकर जागा आणि ४०० कोटी रूपये मंजूर केल्याचा कांगावा ग्रामविकास मंत्री गोरे यांनी केला.मात्र या विषयात तीळमात्र तथ्य नाही.सत्ताधारी भाजपने महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या विषयाची कुचेष्टा चालविली असून केवळ आश्वासनांचा " हवेत गोळीबार करण्याचा एकमेव उद्योग " चालविला आहे असा थेट आरोपही  डाॅ.बगले यांनी केला आहे.

३० कोटी गेले,आता ४०० कोटी..!

यापूर्वी २०१८ साली तत्कालीन अर्थमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी स्मारकासाठी ३० कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती.मात्र जागाच निश्चित न झाल्याने तो निधी परत गेला.आता पुन्हा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी " ४०० कोटी रूपये मंजूर केल्याची हास्यास्पद " घोषणा केली असून हा चेष्टेचा विषय बनला आहे.यामुळेच बसवप्रेमी लिंगायत समाजात असंतोष वाढत आहे.

याशिवाय मंगळवेढ्यासह राज्यातील कोणत्याही स्मारकाशी संबधित अभ्यासू व्यक्तींना आणि स्मारक कृती समितीला विश्वासात न घेता जिल्हा नियोजन विभागाने महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी तांत्रिक सल्लागार नेमायला ३० लाख रूपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. जमीनच उपलब्ध नसताना 30 लाखांचा खर्च कुठे आणि कशासाठी करायचा असा सवाल डाॅ.बगले यांनी केला असून प्रशासनाचा हा उद्योग  म्हणजे " लग्ना अगोदरच पाळणा खरेदी " करण्याचा हास्यास्पद प्रकार आहे.यापूर्वीच असा प्रयत्न फसला आहे.आता पुन्हा बसवेश्वर स्मारकाच्या नांवाने लाखो रुपये उधळण्याचा डाव आहे असेही ते म्हणाले.

भाजप नेत्याचे स्मारक विरोधी षडयंत्र

मंगळवेढ्यातील भाजपच्या एक प्रमुख पदाधिकाऱ्यांने मागील तीन वर्षांपासून कटकारस्थान रचून कृष्ण तलावाची जागा महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी देण्यात येऊ नये अशी गुप्त खेळी रचली आहे.अनेक लोकांना तक्रार करायला प्रवृत्त करून स्मारकाच्या कार्यात आडकाठी आणण्याचे " कृष्णकृत्य " त्याने चालविले आहे.लिंगायत समाजबांधव आणि बसवप्रेमी मंडळी योग्य वेळी त्याला धडा शिकवून रस्त्यावर आणतील असा इशाराही देण्यात आला आहे.जून महिन्याअखेर पर्यंत स्मारकासाठी कृष्ण तलावाची सरकारी जमीन हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव शासनाकडे न पाठविल्यास प्रशासकीय दिरंगाई आणि बेबंदशाहीचा निषेध नोंदविण्यासाठी राज्यभरात सर्व संघटनांचे व्यापक जलआंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ.बसवराज बगले यांनी दिला आहे.

याप्रसंगी स्मारक कृती समितीचे कार्याध्यक्ष राजकुमार सारणे,शिवानंद हिरेमठ,आनंद मुस्तारे,लक्ष्मीकांत पुजारी आदि उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments