अक्कलकोट | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी सतीश मनगुळे | अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याशी संबंधित प्रकरणात १.२० लाखांची लाच स्वीकारताना दोन पोलिस कर्मचारी आणि एक खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात अडकले. या कारवाईनंतर उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांची तातडीने पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
स्कॉर्पिओ वाहन व मोबाईल परत देणे तसेच तक्रारदाराच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. एसीबीने सापळा रचून खासगी व्यक्ती आकाश काडरामे याला १.२० लाखांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात पोलीस हवालदार राजशेखर कोळी व पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत देडे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलिस कर्मचारी फरार असल्याची माहिती समोर आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


0 Comments