अक्कलकोट | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याशी संबंधित प्रकरणात वाहन व मोबाईल परत मिळवून देण्यासाठी तसेच संबंधित नातेवाईकांना मदत करण्याच्या मोबदल्यात १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन पोलीस कर्मचारी आणि त्यांच्यावतीने रक्कम स्वीकारणारा एक खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये पोलीस हवालदार राजशेखर रामचंद्र कोळी, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत दत्तात्रय देडे तसेच आकाश शरण्णाप्पा काडरामे या खासगी व्यक्तीचा समावेश आहे.
माहितीनुसार, तक्रारदाराची स्कॉर्पिओ गाडी त्यांच्या मित्राने वापरासाठी घेतली होती. संबंधित वाहनाचा एका गुन्ह्यात वापर झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी तक्रारदाराच्या भावाचा मोबाईल व वाहन ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. याच प्रकरणात तक्रारदाराच्या वडिलांचे आणि काकांचे नाव गुन्ह्यात समाविष्ट करून अटक करण्याची भीती दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.
वाहन आणि मोबाईल परत देण्यासाठी तसेच नातेवाईकांना मदत करण्याच्या बदल्यात सुरुवातीला १ लाख ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. नंतर ही रक्कम १ लाख २० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आल्याचे एसीबीच्या चौकशीत स्पष्ट झाले.
तक्रारीची पडताळणी १५ जून रोजी करण्यात आली असता लाचेच्या मागणीची पुष्टी झाली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यासमोर आकाश काडरामे याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने १ लाख २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ७, ७-अ आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.
ही कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले व पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणारी व्यक्ती कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.


0 Comments