Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूरच्या विकासासाठी निर्णायक लढा; १२ जून रोजी जिल्हा परिषदेसमोर सोलापूर विकास मंचाचे आंदोलन...विमानसेवा, आयटी पार्क, परिवहन बस सेवा, पाणीपुरवठा व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासह सहा प्रमुख मागण्यांसाठी जनआंदोलन

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |दिनांक ०९/०६/२०२६: सोलापूर शहर व जिल्ह्याच्या प्रलंबित विकासकामांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंचाच्या वतीने शुक्रवार, दिनांक १२ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत जिल्हा परिषद कार्यालय, पुनम गेट, सोलापूर येथे एक दिवसीय शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अनेक प्रश्नांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर विकास मंचाने पुढाकार घेत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदोलनामध्ये खालील प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत :

• सोलापूर–गोवा व सोलापूर–हैदराबाद विमानसेवा बंद पडू न देणे तसेच सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे.

• सोलापूर येथे आय.टी. पार्क तातडीने सुरू करणे.

• कंबर तलाव व पत्रकार भवन परिसरातील रेल्वे पुलांचे रुंदीकरण करणे तसेच विजापूर रोडला सर्व्हिस रोडची सुविधा उपलब्ध करून देणे.

• सोलापूर महानगरपालिकेची परिवहन बस सेवा तातडीने सुरू करणे.

• शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारून नागरिकांना दररोज पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे.

• सोलापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू करणे.

सोलापूर विकास मंचाच्या वतीने शहरातील सर्व सामाजिक संस्था, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, युवक, महिला तसेच जागरूक नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोलापूरच्या विकासासाठी आता केवळ आश्वासने नव्हे तर प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता असून, या आंदोलनाद्वारे शासनापर्यंत सोलापूरकरांच्या भावना आणि अपेक्षा प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments