मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | आधार क्रिटिकल केअरच्या वतीने शुक्रवारी मंद्रूप एसटी स्टॅंडजवळ मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.
या शिबिरामध्ये जनरल आरोग्य तपासणी, रक्तातील ऑक्सिजन मोजमाप, शुगर तपासणी, बी.पी. तपासणी, मोफत औषधांचे वाटप तसेच न्यूट्रीशन मार्गदर्शन आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
यावेळी आधार क्रिटिकल केअरचे डॉ. योगेश राठोड म्हणाले की, रुग्णांना जास्तीत जास्त दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असून, आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून गोरगरीब नागरिकांपर्यंत शासनाच्या आरोग्य योजना पोहोचवण्यासाठी नेहमीच सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. तसेच आधार क्रिटिकल केअरचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, अशा प्रकारची शिबिरे नियमितपणे आयोजित करून गरजू रुग्णांना दिलासा देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या शिबिराला आयोजक डॉ. योगेश राठोड, मंद्रूपच्या सरपंच अनिता कोरे, पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, ग्रामपंचायत सदस्य यासिन मकानदार, सिद्धाराम काळे, अल्ताफ शेख, श्रीमंत पवार, बबलू शेख, आरिफ नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजदत्त रासोलगीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकाश रायचूर यांनी मानले.


0 Comments