Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूपसह सोलापूर जिल्ह्यातील १९ खत दुकानांवर कारवाई; कृषी विभागाचा दणका, परवाने निलंबित..!


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने मोठी धडक कारवाई करत जिल्ह्यातील १९ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. कृषी विभागाच्या तपासणीत विविध नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमध्ये मोहोळ, मंगळवेढा, उत्तर सोलापूर आणि सोलापूर शहरातील खत विक्रेत्यांचा समावेश असून मंद्रूप येथील खत दुकानावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व कृषी व्यावसायिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

कारवाई झालेल्या ठिकाणांमध्ये संगम, कामती, सय्यद वरवडे, अनगर, चिक्कलगी (२ दुकाने), माचनूर (२ दुकाने), सलगर बु., राहे, उचेठाण, डोंगरगाव, वडाळा, पाकणी, पडसाळी, पाथरी, मंद्रूप तसेच सोलापूर शहरातील एका खत दुकानाचा समावेश आहे.

दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील विवेक कृषी भांडार या विक्रेत्याने स्वतःहून दुकान बंद ठेवल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

परवाने निलंबित होण्याची प्रमुख कारणे :

- दुकानासमोर खत साठा फलक न लावणे.

- विक्री रजिस्टर अद्ययावत न ठेवणे.

- खत विक्रीनंतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या न घेणे.

- नियमांनुसार नोंदी व कागदपत्रे न राखणे.

कृषी विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर खते व बियाणे उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांची फसवणूक अथवा नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.

कृषी विभागाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील खत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, इतर विक्रेत्यांनीही नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.


Post a Comment

0 Comments