Advertisement

Breaking News
Loading...

“रिल्सच्या आहारी गेलेली तरुणाई; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर संकट!” – शंकर पटवारी यांचा इशारा...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी आरिफ नदाफ | दि. १० जून – डी. एस. कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट, मंद्रूप येथे एमएस-सीआयटी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट, मंद्रूप व तपस्वी कम्प्युटर इन्स्टिट्यूट, निंबर्गी येथील सुमारे २०० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

गेल्या तीन महिन्यांपासून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा उद्यापासून सुरू होत असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पाराव कोरे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून शंकर पटवारी, सिद्धाराम बिराजदार, राजकुमार कस्तुरे, पंचाक्षरी स्वामी, अभिजीत जवळकोटे, अविनाश जवळकोटे, आदित्य जवळकोटे तसेच पत्रकार अरिफ नदाफ उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शंकर पटवारी यांनी मोबाईलच्या गैरवापराबाबत कठोर इशारा दिला. “रिल्स पाहण्याचे व्यसन आजच्या तरुणांमध्ये वाढत असून त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा, पण पारंपरिक अभ्यास पद्धती विसरू नका,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी सिद्धाराम बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले. एआयचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृतीपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.

पंचाक्षरी स्वामी यांनी सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करत “संकटे कायमस्वरूपी नसतात; आत्मविश्वासाने जीवन जगा,” असा संदेश दिला.

संस्थेचे संचालक अभिजीत जवळकोटे यांनी एमएस-सीआयटी अभ्यासक्रमाचे महत्त्व, संगणक शिक्षणाची गरज आणि भविष्यातील एआय तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याच कार्यक्रमात बसवनगर येथील मुख्याध्यापक राजकुमार कस्तुरे यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमशंकर जवळकोटे यांनी केले. सूत्रसंचालन अभिजीत जवळकोटे यांनी तर आभार प्रदर्शन आदित्य जवळकोटे यांनी केले.




Post a Comment

0 Comments