अक्कलकोट | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव (दे.) येथील श्री महादेव विद्या मंदिर प्रशालेत २१ जून रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सकाळी ७ वाजता प्रशालेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रभाकर बंदीछोडे यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच योगाचे मानवी जीवनातील महत्त्व, निरोगी आरोग्यासाठी योगाची आवश्यकता, मानसिक तणावमुक्ती आणि शारीरिक तंदुरुस्ती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण परिसर योगमय वातावरणाने भारावून गेला होता. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक प्रभाकर बंदीछोडे, पांडुरंग पवार, रशिद पठाण, शाम देशेट्टी, संजीवकुमार हत्तरके, विजयकुमार चव्हाण, अमोल फुलारी, आनंद सूतके, अनिल देशेट्टी,दरेप्पा बिराजदार, काशीनाथ जिरगे यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


0 Comments