शिरापूर सो | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) येथील बंधाऱ्यातून सध्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सात ते आठ टेम्पोंद्वारे वाळूची वाहतूक खुलेआम सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “या वाळूमाफियांना कुणाचा आशीर्वाद आहे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
फक्त शिरापूरच नव्हे, तर मोहोळ तालुक्यातील नरखेड, देगाव, भोयरे, अष्टे, कोळेगाव, अनगर, पासलेवाडी आणि भोगावती या भागांतूनही मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतच आहे, पण स्थानिक पाणीसाठ्यांवरही याचा गंभीर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करून वाळूमाफियांवर लगाम घालावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. आता प्रशासन या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन ठोस पावले उचलणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





0 Comments