पंढरपूर, दि. ११ (हॅलो रिपोर्टर न्यूज ) | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर |
सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग आणि सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी आयोजित एकदिवसीय मराठी व्याकरण या घटकावर प्रशिक्षण कार्यशाळा आणि जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सेमिनार सभागृहात उत्साहात पार पडला.
या प्रसंगी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणस्थळावरून दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन करताना माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले, "देशाची सुसंस्कारित पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण आणि पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यास त्यांचे मनोबल वाढते आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिक प्रेरणा मिळते."
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ रंगनाथ सुंबे होते. यावेळी कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे संपर्कप्रमुख शंकर वडणे, महाराष्ट्र राज्य मराठी शिक्षक संघाचे कार्यवाह डॉ. देविदास गुरव, सहकार्यवाह डॉ. रामचंद्र धर्मसाले, प्राचार्या उज्ज्वला साळुंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र आसबे, जिल्हा सचिव शशिकांत उपासे, उपाध्यक्ष सुभाष भीमनवरू व राजेंद्र माळी, सहसचिव रंगसिद्ध कोरे, कोषाध्यक्ष शिवाजी कौलगे, प्रसिद्धी प्रमुख रवी देवकर, अमोघसिद्ध देशमुख, काकासाहेब जगताप, दयानंद चिकणे, मिनेशकुमार टोणपे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात रंगनाथ सुंबे यांनी मराठी भाषेचे संवर्धन ही शिक्षकांसह शासनाचीही जबाबदारी असल्याचे सांगितले. मराठीचा सर्व क्षेत्रांत वापर वाढविण्याची गरज अधोरेखित करताना न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वाढता वापर हा सकारात्मक बदल असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात सुंबे यांनी इयत्ता पाचवी ते बारावी, शिष्यवृत्ती, टीईटी आणि स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने समग्र मराठी व्याकरण या विषयावर मार्गदर्शन केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कृतीयुक्त, आनंददायी आणि अध्ययन निष्पत्तीवर आधारित अध्यापन पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर डॉ. देविदास गुरव आणि डॉ. रामचंद्र धर्मसाले यांनी मराठी व्याकरण व काव्यरसग्रहण या विषयांवर मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या शंकांचेही समाधान करण्यात आले.
समारोप सत्रात 'सोजीम प्रेरणा पुरस्कार' आणि 'आदर्श मराठी शिक्षक पुरस्कार' देऊन गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल देण्यात आली.
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष राजेंद्र आसबे यांनी या कार्यशाळेला एक हजारांहून अधिक शिक्षकांची उपस्थिती लाभल्याचे सांगितले. पुढील काळात तालुकास्तरीय मराठी अध्यापक मंडळांची स्थापना करून अधिकाधिक शिक्षकांपर्यंत प्रशिक्षण पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मराठी राजभाषा दिन आणि मराठी अभिजात दर्जा दिनानिमित्त जिल्हास्तरीय उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पाटील यांनी केले, तर मुख्याध्यापक शशिकांत उपासे यांनी आभार मानले.










0 Comments