Advertisement

Breaking News
Loading...

आंतरजिल्हा मोटारसायकल चोर जेरबंद; १४ गुन्ह्यांची उकल, ६.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त... शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी....

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दि. १३ : सोलापूर शहर गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत आंतरजिल्हा मोटारसायकल चोराला अटक केली असून त्याच्याकडून सोलापूर, धाराशिव, सातारा आणि कर्नाटक राज्यातील एकूण १४ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. आरोपीकडून ६ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या १४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

शहरात सातत्याने घडणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या घटनांचा तपास करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांनी गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध सुरू केला.

फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना १२ जुलै रोजी गोपनीय माहितीच्या आधारे हैदराबाद रोडवरील मार्केट यार्ड परिसरातून सत्यवान रामहरी भोसले (वय ३२, रा. पडसाळी, ता. उत्तर सोलापूर) याला चोरीच्या होंडा युनिकॉर्न मोटारसायकलीसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने वसंत विहार परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतरच्या तपासात त्याने सोलापूर, धाराशिव, सातारा तसेच कर्नाटक राज्यातील आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले.

तपासादरम्यान आरोपीकडून आणखी १३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. यामध्ये सोलापूर शहरातील ७, धाराशिव जिल्ह्यातील ५, सातारा जिल्ह्यातील १ आणि कर्नाटक राज्यातील १ अशा एकूण १४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून ६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपआयुक्त प्रीतम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी : सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार विनोद रजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सुरज पवार, विजयकुमार वाळके, महेश रोकडे, शैलेश बुगड, महेश शिंदे, युवराज गायकवाड, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.


Post a Comment

0 Comments