Advertisement

Breaking News
Loading...

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोहोळमधील ६ जिल्हा परिषद शाळांची अचानक तपासणी; अनेक त्रुटींवर तातडीच्या कारवाईचे आदेश जिल्हास्तरीय तपासणी समितीची बैठक संपन्न; मागील वर्षी राज्यात उत्कृष्ट कामगिरीबद्दल समितीचा गौरव

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |

मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या जनहित याचिका क्र. १/२०१८ मधील आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तपासणी समितीची बैठक प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या कार्यालयात सोमवारी पार पडली. चालू शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची तपासणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

मागील शैक्षणिक वर्षात समिती अध्यक्ष डॉ. शब्बीर औटी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या हस्ते डॉ. औटी यांचा सन्मान करण्यात आला.

बैठकीनंतर समितीने मोहोळ तालुक्यातील सहा जिल्हा परिषद शाळांची अचानक तपासणी केली. या पाहणीत अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृह, पाणीपुरवठा, वीज, अतिक्रमण, संगणक सुविधा आणि स्वच्छतेसंदर्भातील गंभीर त्रुटी आढळून आल्या. संबंधित अधिकाऱ्यांना त्या तातडीने दूर करण्याचे आदेश देण्यात आले.

मोहोळ क्रमांक १ व २ जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याचे तसेच शाळेच्या संरक्षण भिंतीलगत अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. याची तात्काळ दखल घेत नगरपालिकेच्या प्रतिनिधींना घटनास्थळी बोलावून अतिक्रमण हटविण्याचे आदेश देण्यात आले. संबंधित नागरिकाने स्वखुशीने अतिक्रमण काढण्याची तयारी दर्शविली.

मोहोळ क्रमांक ३ शाळेत अपुरा पाणीपुरवठा, भिंतींवर वाढलेली झाडेझुडपे आणि बंद अवस्थेतील संगणक आढळून आल्याने संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत अपेक्षित प्रयत्न होत नसल्याने मुख्याध्यापकांना समिती अध्यक्षांनी खडसावले.

मोहोळ येथील मुलींच्या जिल्हा परिषद शाळेत अस्वच्छ परिसर, पटांगणात साचलेले पाणी, वीज कनेक्शनचा अभाव, अपूर्ण स्वच्छतागृह आणि प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील त्रुटी आढळल्या. खराब झालेले धान्य तातडीने नष्ट करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये, अशा स्पष्ट सूचना समितीने दिल्या.

जिल्हा परिषद उर्दू शाळेत मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहांची अपुरी सुविधा आणि प्रवेशद्वारावरील अतिक्रमण निदर्शनास आले. याप्रकरणी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना नियमानुसार कारवाईचे आदेश देण्यात आले. तसेच घटती विद्यार्थीसंख्या रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, चंद्रमौळी गणेश मंदिर शाळेने उत्कृष्ट कामगिरीची छाप पाडली. ई-लर्निंग, संगणक शिक्षण, अध्यापनाचा दर्जा, विद्यार्थ्यांची शिस्त आणि प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी याबाबत समितीने समाधान व्यक्त करत मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले.

या तपासणी मोहिमेत समिती अध्यक्ष डॉ. शब्बीर औटी, तहसीलदार जयश्री पंचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस. एस. गोडबोले, प्रवीण सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. पवार, उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे, बापूराव जमादार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.



Post a Comment

0 Comments