सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर | दि. ९ जुलै : सैराट चित्रपटातील 'सल्या' ही भूमिका साकारलेला अभिनेता अरबाज शेख याने वडिलांच्या उपचारादरम्यान झालेल्या कथित गैरप्रकारांबाबत सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ प्रसिद्ध करून न्यायाची मागणी केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने मोठी कारवाई केली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार सोलापूर शहर पथकाने नोबल हॉस्पिटल परिसरातील फातिमा मेडिकलची तपासणी केली. तपासणीत विविध अनियमितता आढळून आल्याने संबंधित मेडिकलला नोटीस बजावत दुकान सील करण्यात आले.
अरबाज शेख यांच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास झाल्याने दोन दिवसांपूर्वी नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान घडलेल्या कथित प्रकारांमुळे अरबाज शेख यांनी भावनिक व्हिडिओद्वारे प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली होती. या प्रकरणाची आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गंभीर दखल घेत तात्काळ तपासणी व आवश्यक कारवाईचे आदेश दिले.
तपासणीत फातिमा मेडिकलमध्ये मुदत संपलेली औषधे आढळल्याचा आरोप असून, विक्रीसाठी ठेवलेल्या औषधांमध्येही नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. तसेच शीतपेटीत (रेफ्रिजरेशनमध्ये) ठेवणे बंधनकारक असलेली औषधे खुल्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचेही पथकाच्या निदर्शनास आले.
या सर्व बाबींची नोंद घेत सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असून संबंधित मेडिकलला नोटीस बजावत सील करण्यात आले आहे.


0 Comments