मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी आरिफ नदाफ | दि. ७ जुलै | अंत्रोळी–गुंजेगाव फाट्याजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय आयटीआय विद्यार्थी रिहान मिनाज मुजावर याचा मृत्यू झाला. समोरील हायवा टिपरने अचानक ब्रेक मारल्याने हा अपघात घडल्याचा आरोप मयताच्या वडिलांनी फिर्यादीत केला असून मंद्रूप पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिहान मुजावर (वय १९) हा सकाळी आपल्या बहिणीला कंदलगाव येथील इंडियन पब्लिक स्कूलमध्ये सोडून आयटीआयच्या प्रॅक्टिकल परीक्षेसाठी सोलापूरकडे दुचाकी (एमएच-१३ ईजी-४७३४) वरून निघाला होता. अंत्रोळी–गुंजेगाव फाट्याजवळ त्याच्या समोरील हायवा टिपर (एमएच-१३ एएक्स-३४११) चालकाने अचानक ब्रेक मारल्याने रिहानच्या दुचाकीची टिपरच्या पाठीमागे जोरदार धडक बसली.
अपघातात रिहान गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच त्याचे वडील मिनाज मुजावर व कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. मंद्रूप पोलिसांनी जखमी रिहानला ग्रामीण रुग्णालय, मंद्रूप येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हायवा चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवत अचानक ब्रेक मारल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी मंद्रूप पोलीस पुढील तपास करत आहेत.


0 Comments