सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |
सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात विद्यार्थ्यांना स्वतःमधील 'स्व' ओळखून आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्याचा संदेश नूतन सहायक राज्यकर आयुक्त प्रशांत शिंदे यांनी दिला.
ते म्हणाले, "आयुष्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी अथक परिश्रमासोबतच त्या क्षेत्राविषयीची आवडही तितकीच महत्त्वाची आहे. पैसा किंवा प्रसिद्धीच्या मागे न लागता विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता आणि आवड ओळखून पुढे जावे."
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नूतन नगररचनाकार अधिकारी नागेश ढाणे, जैन गुरुकुल प्रशालेचे पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, मनपा शाळा क्र. २८ चे मुख्याध्यापक परमेश्वर सुतार आणि लोकराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे उपस्थित होते.
नागेश ढाणे यांनी शाहू महाराजांचा सामाजिक न्यायाचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. अध्यक्षीय समारोपात अण्णासाहेब भालशंकर यांनी महापुरुषांना जातीच्या चौकटीत विभागण्याच्या प्रवृत्तीवर टीका करत, निबंध व चित्रकला स्पर्धेसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये समता, बंधुता आणि सामाजिक जाणीवा रुजविण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
यावेळी पूजा पाटील, स्नेहल जाधव, रमेश वाघमैतर, प्रवीण कस्तुरे आणि परमेश्वर सुतार यांनीही मनोगत व्यक्त केले. राज्यातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बुद्धजय भालशंकर यांनी केले, तर भोजराज गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय पल्लोऊ, संदीप चव्हाण, साक्षी सोनकांबळे, भौरम्मा वाघमारे आणि सतीश सोनवले यांनी विशेष परिश्रम घेतले.















0 Comments