Advertisement

Breaking News
Loading...

चाऱ्यासाठी ३०५ जनावरे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार! डिजिटल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल पाटील यांचा प्रशासनाला इशारा; २ ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून देण्याची मागणी...


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, पिण्याच्या पाण्याचे टँकर तसेच पशुधनासाठी तातडीने चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी डिजिटल शेतकरी संघटना, शिरापूर (ता. मोहोळ) चे संस्थापक अध्यक्ष अनिल अबाजी पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

या मागणीसंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ग्रामीण, पोलीस आयुक्त विशेष शाखा, तहसीलदार मोहोळ, पोलीस निरीक्षक सदर बाजार, राष्ट्रीय महामार्ग कार्यालय तसेच मोहोळ पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले आहे.

पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, लोकमंगल साखर कारखाना परिसरात पाच कुटुंबांकडील सुमारे ३०५ जनावरे असून त्यांच्या चाऱ्यासाठी दररोज मोठा खर्च होत आहे. जनावरांसाठी दररोज सुमारे २४ हजार रुपयांचा चारा, तर चारा तोडणे व वाहतूक करण्यासाठी सुमारे ६ हजार रुपये खर्च येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे एकूण सुमारे ३० हजार रुपये प्रतिदिन खर्च होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

२०१४-१५ मध्येही केली होती जनावरांची सेवा

दुष्काळाच्या काळात यापूर्वीही आपण या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी व्हावे लागले आणि कर्ज फेडण्यासाठी दोन एकर शेती विकावी लागली, असा दावा अनिल पाटील यांनी केला आहे. तसेच १६ मे २०१९ रोजी शासनाची मान्यता घेऊन शिरापूर येथे चारा छावणी सुरू केल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, लोकमंगल कारखाना परिसरातील पशुपालकांनी १९ सप्टेंबर २०२६ रोजी जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे पत्र दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

२ ऑक्टोबरपर्यंत चारा द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा

प्रशासनाने २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ३०५ जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास पुणे-मुंबई येथे जाऊन जनावरांसाठी चारा मिळविण्यासाठी भिक्षा मागण्याचे आंदोलन करण्याचा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

तसेच ३० सप्टेंबर २०२६ रोजी ३०५ जनावरे घेऊन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार असल्याचे त्यांनी प्रशासनाला कळविले आहे. लोकमंगल कारखाना ते सोलापूर असा जनावरांसह प्रवास करताना राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची सुरक्षित व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येताना कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शेतकरी व पशुपालकांना तातडीने मदत करावी आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी डिजिटल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल अबाजी पाटील यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments