Advertisement

Breaking News
Loading...

गुंजेगावात वृद्ध आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोन मुलांविरोधात मंद्रूप पोलिसात गुन्हा दाखल...



मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी झटकून त्यांना मानसिक, सामाजिक तसेच मूलभूत गरजांपासून वंचित ठेवणाऱ्या दोन मुलांविरोधात मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांचा सांभाळ करणे ही केवळ नैतिक जबाबदारी नसून कायदेशीर कर्तव्य आहे, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

चौकशीत आरोपींकडून दीर्घकाळ आई-वडिलांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे, अपमानास्पद वागणूक दिल्याचे तसेच उपजीविकेसाठी आवश्यक सुविधा नाकारल्याचे निष्पन्न झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही सुधारणा न झाल्याने अखेर पोलिसांनी कठोर पाऊल उचलत संबंधित आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

वृद्ध नागरिकांना त्रास देणाऱ्यांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. समाजात वृद्धांना सन्मानाने जगण्याचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

ही कारवाई समाजातील प्रत्येक नागरिकाला जबाबदारीची जाणीव करून देणारी असून, आई-वडिलांकडे पाठ फिरवणाऱ्यांसाठी हा स्पष्ट इशारा असल्याचे बोलले जात आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. 404/2025 नुसार ज्येष्ठ नागरिक पालन-पोषण अधिनियम 2007 चे कलम 24 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात फिर्यादी अभिमान बाबा कापसे (वय 75, रा. गुंजेगाव, ता. दक्षिण सोलापूर) असून आरोपी म्हणून
गोरख अभिमान कापसे, मच्छिंद्र अभिमान कापसे, (दोघेही रा. गुंजेगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण करीत आहेत.

Post a Comment

0 Comments