सोलापूर शहर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: अखेर बहुचर्चित रेल्वे पूल पाडण्याची प्रक्रिया आज सुरू झाली. सकाळी ८.३० ते १०.३० या कालावधीत रेल्वेची विद्युत वाहिनी (इलेक्ट्रीक लाईन) सुरक्षितरीत्या खाली आणण्यात आली. त्यानंतर सकाळी १०.३० वाजल्यापासून पुलावरील चुना-वाळूचे बांधकाम ब्रेकरच्या साह्याने तोडण्याचे काम सुरू करण्यात आले.
या पुलाखाली एकूण २० गर्डर असून, ते क्रेनच्या मदतीने पाच टप्प्यांत काढले जाणार आहेत. संपूर्ण कारवाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केली जात असून, रेल्वे प्रशासन, मक्तेदार आणि कामगार यांचा समन्वय साधण्यात आला आहे.
पूल पाडण्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. मक्तेदाराकडून १५० कामगार, तर रेल्वे विभागाकडून सुमारे २०० कामगार कामावर आहेत. २०० टन क्षमतेच्या तीन क्रेनच्या साह्याने गर्डर काढण्याचे काम केले जाणार असून, २२० किलो क्षमतेच्या चार ब्रेकरने पुलाचे बांधकाम तोडले जात आहे.
सुरक्षितता आणि वेळेचे काटेकोर नियोजन ठेवून ही कारवाई सुरू असून, पुल पाडण्याची प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.





0 Comments