मुंबई हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी :- दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत निवडणूक वेळापत्रक घोषित करताच शहरी राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. आयोगाच्या निर्णयानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान होणार असून, अर्जांची छाननी ३१ डिसेंबरला केली जाईल. उमेदवारी माघार घेण्याची अंतिम तारीख २ जानेवारी २०२६ असून, ३ जानेवारीला चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
सध्या अनेक महापालिकांमध्ये प्रशासक राजवट असल्याने या निवडणुकांकडे विशेष लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, निवडून आलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. अन्यथा संबंधित उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.
या निवडणुकीसाठी राज्यभरात ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार असून, १ जुलै २०२५ रोजीची अधिसूचित मतदारयादी वापरण्यात येणार आहे. मतदारांच्या सोयीसाठी मोबाईल अॅपद्वारे मतदान केंद्र, प्रभाग व नावाची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असून, स्टार प्रचारकांची संख्या २० वरून ४० करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकांच्या घोषणेमुळे राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या काही दिवसांत प्रचाराचा जोर वाढणार हे निश्चित आहे.

0 Comments