वडापूर/ दक्षिण सोलापूर प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: मौजे वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील महिला व बालकल्याण समितीच्या अंतर्गत चालणारी कै. बाबुराव अण्णा पाटील सर्वांगीण विकास माध्यमिक प्रशाला गेली ४५ वर्षे मूलभूत सोयीसुविधांशिवाय सुरू असून शाळेची स्वतःची इमारत अद्याप बांधली न गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण पत्र्याच्या जीर्ण, गळक्या इमारतीत सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
या गंभीर परिस्थितीवर रिपब्लिकन सेना महाराष्ट्र नेते व सोलापूर जिल्हा प्रभारी सिद्राम ऊर्फ सिद्धार्थ महादेव कांबळे यांनी जिल्हाधिकारी, CEO, पोलिस अधीक्षक व शिक्षण विभागाकडे तातडीने प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे.
कांबळे यांनी मागील दोन वर्षांत या शाळेविरुद्ध अनेक तक्रारी दाखल करून चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार माध्यामिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तीन वेळा चौकशीचे आदेश दिले होते. उपशिक्षणाधिकारी हवेली मॅडम, गटविकास अधिकारी मल्हारी बनसोडे आणि अलीकडेच उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांनी शाळेची पाहणी करून शाळेवर प्रशासक नेमावा, असा ठोस अहवाल सादर केला असल्याची माहितीही संबंधितांकडून मिळाली आहे.
या सर्व चौकशी अहवालांच्या आधारे शाळेत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत कांबळे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की—
➡️ जर ५ जानेवारी २०२६ पर्यंत प्रशासकाची नियुक्ती केली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज गेट (पुणम गेट) सोलापूर येथे आमरण उपोषण सुरू केले जाईल.
याबाबतचे लेखी निवेदन सर्व संबंधित अधिकार्यांना देण्यात आले असून, प्रशासन पुढील पावले काय उचलते, याकडे स्थानिक नागरिक आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

0 Comments