Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप येथे शैक्षणिक प्रबोधन शिबिराचे उद्घाटन व राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त कै. निर्मलाताई कमळे आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण समारंभ...

 


मंद्रूप | दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाच्या वतीने मंद्रूप येथील दी. शि. कमळे गुरुजी शिक्षण संकुलात ४२ वे शैक्षणिक प्रबोधन शिबिर शनिवारी दि. २० रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आले आहे. बदलती शिक्षण व्यवस्था, सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण महर्षी तसेच आरोग्य या विषयांवर या शिबिरात मार्गदर्शन होणार आहे.

या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या हस्ते होणार असून संस्थेचे अध्यक्ष पी. एल. कोळी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्राचार्य नरेश बदनोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.



या प्रसंगी राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त शिक्षिका निर्मलाताई कमळे यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षिका पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सोलापुरातील नूतन मराठी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका स्मिता कांगुणे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

शिबिरात ज्येष्ठ पत्रकार राजा माने हे बदलती शिक्षण व्यवस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सोलापूर जिल्हा शिक्षण क्षेत्रातील शिल्पकार या विषयावर प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांचे व्याख्यान होणार आहे. याचबरोबर व्यसन व आपले आरोग्य या विषयावर कुर्डुवाडी येथील डॉ. जयंत करंदीकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

या महत्त्वपूर्ण शैक्षणिक प्रबोधन शिबिरास शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष पी. एल. कोळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments