मंद्रूप (दक्षिण सोलापूर प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे), दि. १८ : मंद्रूप येथील ग्रामदैवत श्री मळसिद्ध यात्रेनिमित्त प्रथमच तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून, यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. बारा, तेरा आणि चौदा जानेवारी २०२६ या कालावधीत हे भव्य कृषी प्रदर्शन मंद्रूप येथील निंबर्गी रस्त्यावरील कै. महादेव म्हेत्रे मैदानावर भरविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल तीन एकर जागा निश्चित करण्यात आली असून, भव्य स्वरूपात प्रदर्शन साकारण्याचा निर्धार यात्रा कमिटीने केला आहे.
दरवर्षी १२ ते १६ जानेवारीदरम्यान पाच दिवस चालणाऱ्या श्री मळसिद्ध यात्रेत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षीपासून या यात्रेच्या निमित्ताने शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शन आयोजित करण्याची संकल्पना नियोजन बैठकीत मांडण्यात आली होती. शेतकऱ्यांना शेतीपूरक यांत्रिक अवजारे, आधुनिक यंत्रसामग्री, नवनवीन पीक पद्धती, तसेच आधुनिक व सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन मिळावे, उत्पादनवाढीसाठी नवे प्रयोग कसे करावेत याची माहिती मिळावी, या उद्देशाने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्याची सूचना मांडण्यात आली होती.
या सूचनेचे स्वागत करत यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅड. राजेश देशमुख यांनी यंदा मंद्रूपमध्ये सलग तीन दिवस कृषी प्रदर्शन भरविण्याची अधिकृत घोषणा केली. त्यानुसार १२, १३ व १४ जानेवारी २०२६ रोजी हे प्रदर्शन संपन्न होणार आहे.
कृषी प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष, पदाधिकारी व मानकरी यांनी कै. महादेव म्हेत्रे मैदानाची पाहणी केली. यावेळी तीन एकर जागेवर उभारण्यात येणारा भव्य मंडप, विविध कंपन्यांसाठी स्टॉल्स, पाणी, वीज आदी आवश्यक सुविधांबाबत चर्चा करून पाहणी करण्यात आली. मंद्रूपमधील पहिलेच कृषी प्रदर्शन यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेश देशमुख, श्री मळसिद्ध देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे व आप्पाराव कोरे, रमेश नवले, पत्रकार पंचाक्षरी स्वामी, जगन्नाथ म्हेत्रे, रवीशंकर म्हेत्रे, बाळासाहेब देशमुख, चंद्रकांत देशमुख, सुरेश पाटील, मळसिद्ध पुजारी, तमण्णा पुजारी, बाबुशा शेंडगे, अनंत म्हेत्रे, सुरेश टेळे, कांतू ख्याडे, दयानंद ख्याडे, सुनील व्हनमाने, सोमनिंग टेळे, सचिन फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते.



0 Comments