सोलापूर शहर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: संत गाडगेमहाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात आज शनिवारी सकाळी स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली. या सामाजिक उपक्रमात विधी व न्याय विभाग, सोलापूर बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य, सोलापूर महानगरपालिका प्रशासनासह सद्गुरु बैठकीला नियमित उपस्थित असणाऱ्या श्री सदस्यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.
न्यायालय परिसर, प्रवेशद्वार, वाहनतळ व आजूबाजूच्या परिसरात साचलेला कचरा साफ करण्यात आला. यावेळी सद्गुरु बैठकीतील शेकडो श्री सदस्यांनी स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवत स्वच्छता, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.
स्वच्छता हीच खरी सेवा असून संत गाडगेमहाराज यांच्या विचारांप्रमाणे समाजासाठी प्रत्यक्ष कृतीतून योगदान देणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या मोहिमेमुळे न्यायालय परिसर अधिक स्वच्छ व सुंदर झाला असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश गेला आहे.
अशा उपक्रमांतून सामाजिक सलोखा व जनजागृती घडत असून भविष्यातही या प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.




0 Comments