संसद भवन, नवी दिल्ली (हॅलो रिपोर्टर न्यूज) | हिवाळी अधिवेशन २०२५:
महाराष्ट्रातील अतिवृष्टी, ओला दुष्काळ आणि पुरपरिस्थितीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचा जळजळीत सवाल आज लोकसभेत जोरदारपणे उमटला. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात सरकारवर तिखट शब्दांत हल्लाबोल करत तातडीची मदत देण्याची मागणी केली.
खासदार शिंदे म्हणाल्या की, “महाराष्ट्रात भीषण अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. पिके वाहून गेली, जनजीवन विस्कळीत झाले. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत अपुरी आहे. परंतु याहून गंभीर बाब म्हणजे केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या NDRF सहाय्यासाठी महाराष्ट्र सरकारने अद्याप प्रस्तावच पाठविला नाही. हा शेतकऱ्यांवरील सरळ अन्याय आहे.”
त्यांनी पुढे म्हटले की, राज्यातील शेतकरी आज आर्थिक खोल संकटात आहेत, पण सरकार निवडणूक राजकारणात व्यस्त आहे. “शेतकरी आमचे मायबाप आहेत. आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची, कर्जमाफी देण्याची, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जमाफीची मागणी केली. पण सरकारने कानाडोळाच केला. शेतकऱ्यांची वेदना सरकारला दिसतच नाही,” असा आरोप त्यांनी सभागृहात केला.
खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारकडे तात्काळ NDRF प्रस्ताव मागवण्याची, शेतकऱ्यांना त्वरित मदत पोहोचवण्याची आणि नुकसानग्रस्त भागांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांची व्यथा संसदेत जोरदारपणे उमटल्यामुळे राज्यातील शेतकरीवर्गात त्यांच्या वक्तव्याचे कौतुक होत आहे.

0 Comments