सोलापूर शहर हॅलो रिपोर्टर न्यूज : काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या अनपेक्षित भाजप प्रवेशानंतर सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असतानाच भारतीय जनता पार्टीने आणखी एक महत्त्वाचा डाव टाकला आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रमुख जबाबदारीसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचे अधिकृत पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले आहे.
माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशामुळे आधीच आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते.
अशा वातावरणातच आता भाजपने थेट आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या खांद्यावर महापालिका निवडणुकीची धुरा सोपविल्याने पक्षातील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. ही नियुक्ती म्हणजे देशमुख गटासाठी आणखी एक धक्का आहे का, की भाजपमधील नवी नेतृत्वरेषा ठळकपणे पुढे येत आहे, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
एकीकडे संघटन मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न, तर दुसरीकडे जुन्या-नव्या नेत्यांतील ताणतणाव—या साऱ्या घडामोडींमुळे सोलापूर महापालिकेची निवडणूक आता अधिकच रंगतदार होणार, हे मात्र नक्की.
![]() |
| 2025 |


0 Comments