मंद्रूप दि. 9 डिसेंबर: (दक्षिण सोलापूर प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे): वीरशैव लिंगायत वाणी-पंचम समाज संघटना, मंद्रूप यांच्या अध्यक्षपदी रेवणसिद्ध बाबुराव मेंडगुदले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवड प्रक्रियेत समाजातील मान्यवरांनी एकमुखाने विश्वास दाखवून मेंडगुदले यांच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवली.
रेवणसिद्ध मेंडगुदले हे मुळचे मंद्रूप येथील असून एम.ए., एम.एड., बी.जे. (पत्रकारिता) आणि आय.टी.आय.पर्यंत शिक्षण घेतले आहे. मागील दोन दशकांपासून ते ग्रामीण पत्रकारिता, सामाजिक काम, सांस्कृतिक उपक्रम आणि जनसेवा क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. ते SNX मराठी (सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस) या डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक व पत्रकार असून श्री सिद्धेश्वर सामाजिक बहुउद्देशीय संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना मेंडगुदले म्हणाले, “माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व समाज बांधवांचे मनःपूर्वक आभार. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणांची साथ हीच माझी प्रेरणा आहे. समाजातील विद्यार्थी, गरजवंत, बेरोजगारांना मदत, शैक्षणिक मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि समाज ऐक्य मजबूत करण्यासाठी संघटनेला अधिक सक्षम करण्याचा माझा संकल्प आहे.”
पुढील काळात संघटनेतर्फे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरे, मेधावी विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजूंसाठी मदतकार्य, सामाजिक ऐक्य उपक्रम, तसेच वयोवृद्ध आणि महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मेंडगुदले यांच्या निवडीबाबत समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव होत असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा ओघ सुरू आहे.

0 Comments