सोलापूर (ग्रामीण) | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी:
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणने प्रभावी कारवाई करत दरोडा व घरफोडीच्या एकूण 04 गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या सराईत आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून घरफोडीचे तब्बल 12 गुन्हे उघडकीस आले असून 82.32 ग्रॅम सोन्याचे व 60 ग्रॅम चांदीचे दागिने, असा सुमारे 10 लाख 85 हजार 160 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांनी फरार व पाहिजे असलेल्या आरोपींवर लक्ष केंद्रीत करून स्वतंत्र पथके नियुक्त केली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंद्रुप व मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाहिजे असलेला आरोपी डोणज (ता. मंगळवेढा) परिसरात येणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने डोणज येथे सापळा रचला. संशयित आरोपी पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव अजित उर्फ काळया सुरेश पवार (वय 29, रा. नंदूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असल्याचे सांगितले.
कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपीने मंद्रुप, मोहोळ, मंगळवेढा व दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये मागील एक वर्षात घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. मंद्रुप पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्याला अटक करून पोलीस कोठडी रिमांड घेतल्यानंतर त्याच्याकडून एकूण 12 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
या प्रकरणात आरोपीकडून जप्त केलेला मुद्देमाल बाजारमूल्याप्रमाणे 10.85 लाख रुपयांचा असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांमार्फत सुरू आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, ख्वाजा मुजावर तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी बजावली आहे.



0 Comments