दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे एका ४१ वर्षीय व्यक्तीने आर्थिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १९ जानेवारी २०२६) दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मयताचे नाव विक्रम महासिद्ध व्हनकोरे (वय ४१, रा. भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर) असे असून, दुपारी सुमारे ३.४० वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरात लोखंडी पाईपला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेची माहिती मयताचा भाऊ सुधाकर महासिद्ध व्हनकोरे (वय ३६) यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
प्राथमिक चौकशीत मयतावर बँकेचे कर्ज असल्याने तसेच दीर्घकालीन आजारामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद क्रमांक ०५/२०२६ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मुलाणी हे करीत असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती मंद्रूप पोलीसांकडून देण्यात आली आहे.

0 Comments