Advertisement

Breaking News
Loading...

घरफोडी व कॉपर वायर चोरीच्या 16 गुन्ह्यांचा पर्दाफाश; पाहिजे आरोपी सोलापूर ग्रामीण एलसीबीच्या ताब्यात...

 


पंढरपूर | हॅलो रिपोर्टर न्यूज : 24 जानेवारी 2026

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात घरफोडी व कॉपर वायर चोरीच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणने मोठी कारवाई करत 03 घरफोडी व 13 कॉपर वायर चोरी अशा एकूण 16 गुन्ह्यांतील पाहिजे असलेल्या आरोपीस अटक केली आहे.

मा. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांनी वेगवेगळी पथके तयार करून रेकॉर्डवरील फरार व पाहिजे आरोपींविरोधात विशेष मोहीम राबवली.

पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के यांच्या पथकातील सफौ. प्रकाश कारटकर यांना खात्रीशीर गोपनीय बातमी मिळाली की, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालमत्तेच्या गुन्ह्यांतील पाहिजे असलेला आरोपी पंढरपूर शहरातील एस.टी. स्टँड परिसरात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने एस.टी. स्टँड परिसरात सापळा रचला असता, संशयित इसम पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहूल रतिलाल काळे (वय 30), रा. करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर असे असून तो सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील घरफोडी व कॉपर वायर चोरीच्या एकूण 16 गुन्ह्यांमध्ये पाहिजे होता. कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपीने इतर साथीदारांसोबत कॉपर वायर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

सदर आरोपीस सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 440/2024 अन्वये बीएनएस कलम 303(2), 324(4) प्रमाणे अटक करण्यात आली आहे. आरोपीवर सोलापूर तालुका, करकंब, मोहोळ, वळसंग, माळशिरस, पंढरपूर ग्रामीण, माढा व अकलुज पोलीस ठाण्यांतील विविध गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, सफौ. प्रकाश कारटकर, पोह. सलीम बागवान, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, प्रमोद शिंपाळे व योगेश जाधव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Post a Comment

0 Comments