बोरामणी | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
कासेगाव– बोरामणी परिसरातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना, शिवसेना (शिंदे गट) कडून सुनिता चव्हाण या बोरामणी महिला गणातून अधिकृत उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे राजकीय हालचालींना वेग आला असून, त्यांचे पती रमेश धनंजय चव्हाण यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र, या कथित धमक्यांना न जुमानता “कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही शिवसेना शिंदे पक्षाचाच झेंडा फडकवणार”, असा ठाम निर्धार रमेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी कासेगाव पंचायत समिती गणातील शिवसेना (शिंदे गट) चे अधिकृत उमेदवार श्रीकांत वाडकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मागे घेतल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यांच्या या माघारीमागे ‘धनलक्ष्मीपुढे झुकून पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप’ शिवसैनिक व ग्रामस्थांकडून करण्यात आला होता. या घटनेमुळे शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला होता.
याच पार्श्वभूमीवर आता सुनिता चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत दबाव व धमक्यांचे आरोप समोर आल्याने, हा प्रकार पुन्हा एकदा शिवसेनेच्या निष्ठेचा कस पाहणारा ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
🟠 रमेश चव्हाण यांचा ठाम इशारा :
पत्रकारांशी बोलताना रमेश चव्हाण म्हणाले, “लोकशाहीत निवडणूक लढवणे हा आमचा अधिकार आहे. याआधी काही लोकांनी पैशांच्या जोरावर उमेदवारी माघार घ्यायला लावल्याचे आरोप झाले. पण आम्ही तसे होऊ देणार नाही. धमक्या कितीही आल्या तरी शिवसेना शिंदे पक्षाचा झेंडा बोरामणीत फडकणारच,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
🔵 महिला नेतृत्वामुळे निवडणूक अधिक रंगतदार :
सुनिता चव्हाण या सामाजिक कार्यात सक्रिय असून, महिला गटातून सक्षम व निर्भीड नेतृत्व पुढे येत असल्याने त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे बोरामणी नामा प्रभागातील निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.
🌡️ राजकीय वातावरण तापले :
एकीकडे उमेदवारी माघारी व गद्दारीच्या आरोपांच्या आठवणी ताज्या असताना, दुसरीकडे धमक्यांच्या आरोपांमुळे बोरामणी व कासेगाव परिसरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आक्रमक भूमिकेत उतरल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

0 Comments