वळसंग | हॅलो रिपोर्टर न्यूज : प्रतिनिधी मल्लू अण्णा कांबळे:
वळसंग पोलीस ठाणे येथे आज माननीय पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांची वार्षिक तपासणी यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्याच्या एकूण कार्यपद्धतीचा सखोल आढावा घेतला.
तपासणीदरम्यान गुन्हे नोंदी, अर्ज, मयत प्रकरणे तसेच इतर शासकीय अभिलेखांची बारकाईने पाहणी करण्यात आली. पोलीस ठाण्याचा संपूर्ण परिसर तपासून तो स्वच्छ, सुसज्ज व नागरिकाभिमुख स्वरूपात विकसित करण्यात आल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी समाधान व्यक्त केले.
यानंतर पोलीस अधीक्षकांनी अधिकारी व कर्मचारी यांचा दरबार घेत त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. तसेच कामकाज अधिक प्रभावी, पारदर्शक व नागरिकांना दिलासा देणारे होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.
याचवेळी चोरी व फसवणूक प्रकरणात पुण्यातून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल पोलीस अधीक्षकांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला. मुद्देमाल मिळाल्यानंतर फिर्यादींनी आनंद व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
दरम्यान, पोलीस ठाण्यातील सर्व मुद्देमालाची माहिती डिजिटल पद्धतीने जतन करण्यात आली असून प्रत्येक मुद्देमालावर क्यूआर कोड आधारित प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे मुद्देमालाची माहिती तत्काळ उपलब्ध होण्यास मदत होत असून कामकाजात अधिक पारदर्शकता येत असल्याचे सांगण्यात आले.




0 Comments