Advertisement

Breaking News
Loading...

भाजपच्या एबी फॉर्म गोंधळाने निंबर्गी गणात राजकीय उलथापालथ; जनतेच्या आग्रहाखातर शैलजा जानकर अपक्ष मैदानात...

 


दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज, दि. 23 जानेवारी | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:

दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी पंचायत समिती गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून, या गणात भाजपच्या एबी फॉर्म गोंधळामुळे राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. सामाजिक कार्यकर्त्या शैलजा सिद्धाराम जानकर यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा असतानाच भाजपकडून एकाच गणातून दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला. या गोंधळात शैलजा जानकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी मिळाली नाही.

भाजपने निंबर्गी गणातून विद्यमान पंचायत समिती सदस्य शशिकांत दुपारगुडे यांना पुन्हा एबी फॉर्म देत अधिकृत उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांच्या मागील पाच वर्षांच्या कामकाजाबाबत मतदारांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. जनतेपर्यंत विकासकामे व लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे पोहोचले नसल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

दुसरीकडे, गोरगरीबांचे प्रश्न, महिलांच्या समस्या तसेच शासकीय योजना तळागाळात पोहोचविण्याचे सातत्यपूर्ण कार्य यामुळे शैलजा सिद्धाराम जानकर यांनी आपली स्वतंत्र आणि ठाम सामाजिक ओळख निर्माण केली आहे. निंबर्गी, माळकवठे, कारकल, औज (मं.), कुरघोट, टाकळी, चिंचपूर या गावांमध्ये सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम जानकर यांनी उभे केलेले कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे शैलजा जानकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.

या सर्व गावांतील नागरिकांनी “पक्ष काहीही असो, आम्ही तुमच्यासोबत आहोत” असा ठाम विश्वास व्यक्त करत शैलजा जानकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला आहे. जनतेच्या या भावनिक पाठिंब्यामुळे शैलजा सिद्धाराम जानकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, भाजपच्या एकाच गणातील दोन एबी फॉर्ममुळे पक्षांतर्गत नाराजी व मतभेद चव्हाट्यावर आले असून, याचा थेट परिणाम मतविभाजनावर होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. या गोंधळाचा सर्वाधिक फायदा अपक्ष उमेदवारांना होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे निंबर्गी गणातील निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीची आणि निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

याशिवाय, शैलजा सिद्धाराम जानकर यांना अनुसूचित जाती-जमातींसोबतच लिंगायत, धनगर आणि मराठा समाजातूनही वाढता पाठिंबा मिळत असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे. विविध समाजघटकांचा मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता, निंबर्गी गणातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून जानकर यांचे पारडे सध्या जड मानले जात आहे.

Post a Comment

0 Comments