Advertisement

Breaking News
Loading...

वडिलांच्या वैधतेवर वाद असला तरी नातेवाईकांच्या वैधतेच्या आधारे विद्यार्थ्यास ‘ठाकर अनुसूचित जमात’ वैधता मंजूर...


 

मुंबई | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी:

वडिलांच्या जात वैधता प्रमाणपत्रा बाबत चौकशी सुरू असली, तरी जवळच्या रक्तसंबंधातील नातेवाईकांच्या वैधतेच्या आधारे विद्यार्थ्यास ‘ठाकर अनुसूचित जमात’ म्हणून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक व एस. एम. मोडक यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.


शबू विष्णू ठाकर (वय 19, विद्यार्थी, बोरीवली, मुंबई) यांनी ठाकर अनुसूचित जमात वैधता नाकारल्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्याच्या वडिलांनी पूर्वी “भटक्या जमाती” (Nomadic Tribe) म्हणून जात प्रमाणपत्र घेतले होते व ही बाब लपवून नंतर “ठाकर अनुसूचित जमात” वैधता घेतल्याचा आरोप करत छाननी समितीने त्यांची वैधता ग्राह्य धरली नव्हती.


राज्य शासनाच्या वतीने युक्तिवाद करताना असे नमूद करण्यात आले की, वडिलांच्या जात वैधतेसंदर्भात कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


मात्र, याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. सुशांत येरमवार यांनी प्रभावी व अभ्यासपूर्ण युक्तिवाद करत, याचिकाकर्त्याच्या सख्ख्या बहिणीसह इतर जवळच्या रक्तसंबंधातील नातेवाईकांना ‘ठाकर अनुसूचित जमात’ म्हणून वैधता प्रमाणपत्रे देण्यात आलेली असून ती अद्याप वैध असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.


न्यायालयाने यापूर्वीच्या ‘अपुर्वा विनय निचले विरुद्ध विभागीय जात प्रमाणपत्र छाननी समिती’ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ‘महाराष्ट्र आदिवासी ठाकर जमात संरक्षण समिती विरुद्ध महाराष्ट्र राज्य’ या निर्णयांचा संदर्भ देत, नातेवाईकांच्या वैधतेस महत्त्व दिले.


खंडपीठाने छाननी समितीचा आदेश रद्द करत, सहा आठवड्यांच्या आत याचिकाकर्त्यास ‘ठाकर अनुसूचित जमात’ जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले. तसेच वडिलांच्या जात वैधतेबाबत सुरू असलेली कारणे दाखवा नोटीस कायद्याप्रमाणे पुढे नेण्यास मोकळीक देण्यात आली आहे.


या निकालामुळे जात वैधता प्रकरणात नातेवाईकांच्या वैधतेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, ॲड. सुशांत येरमवार साहेबांच्या ( मोबाईल: 98230 99140 ) यशस्वी व प्रभावी युक्तिवादाबद्दल कायदेविषयक क्षेत्रातून तसेच समाजातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments