मुंबई | हॅलो रिपोर्टर न्यूज :
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये भक्कम सुधारणा घडवून आणण्यासाठी राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अधिक पारदर्शक व लाभार्थी-केंद्रित पद्धतीने पुढे जात आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थी महिलांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत e-KYC पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, e-KYC प्रक्रियेदरम्यान काही महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला जाणे अथवा तांत्रिक अडचणी निर्माण होण्याच्या बाबी शासनाच्या निदर्शनास आल्या.
यामुळे पात्र महिलांना लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.
योजनेच्या निकषांनुसार संबंधित लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्यात येणार असून, ही प्रक्रिया अंगणवाडी सेविकांमार्फत राबवली जाणार आहे.
याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, कोणत्याही पात्र “लाडक्या बहिणी”वर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे.
ही बातमी हजारो लाडक्या बहिणींसाठी आश्वासक ठरणारी असून, e-KYC मधील त्रुटींमुळे थांबलेले लाभ पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शासनाचा हा निर्णय म्हणजे महिलांच्या हितासाठी उचललेले एक सकारात्मक आणि संवेदनशील पाऊल असल्याचे स्पष्ट होते.
लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका — तुमचा हक्काचा लाभ सुरक्षित आहे..!

0 Comments