बोरामणी| हॅलो रिपोर्टर न्यूज| प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
कासेगाव पंचायत समिती गणातील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली असून, बोरामणी गट पंचायत समिती गणातील शिवसेना (शिंदे गट) चे अधिकृत उमेदवार शंकर वाडकर यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडीमागे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी राजकीय कुरघोडी केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
या अनपेक्षित माघारीमुळे शिवसैनिकांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, निवडणुकीच्या ऐन तोंडावर उमेदवारी मागे घेणे म्हणजे शिवसेना आणि कासेगावच्या मतदारांशी विश्वासघात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गावातील प्रतिष्ठित नागरिक श्रीशैल देवमाने–पांगरकर यांनी पत्रकारांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले,
“निवडणुकीच्या वेळी पाठ फिरवणारे लोक जनतेच्या विश्वासास पात्र ठरत नाहीत. बरं झालं, आमच्यातला नासका कांदा बाहेर पडला,” अशी बोचरी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
🔶 शिवसेनेच्या दुसऱ्या अधिकृत उमेदवाराचा आरोप :
शिवसेनेचे एबी फॉर्म प्राप्त उमेदवार रामहरी आप्पा चौगुले यांनीही तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत सांगितले की, “ही केवळ पक्षाची नाही, तर संपूर्ण कासेगावकरांची फसवणूक आहे. याचे राजकीय परिणाम संबंधितांना भविष्यात भोगावे लागतील,” असा आरोप त्यांनी केला.
🔷 धनेश अचलारे यांची मतदारांना भावनिक साद :
दरम्यान, शिवसेनेचे जिल्हा परिषद बोरामणी गटातील अधिकृत उमेदवार धनेश सुभाष अचलारे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मतदारांना आवाहन केले.
“ एक लाडका भाऊ उमेदवारी मागे घेतला असला, तरी मी आणि शिवसेना तुमच्यापासून दूर गेलो नाही. मी तुमचा लाडका भाऊ तुमच्या अखंड सेवेसाठी सज्ज असून, मला भरघोस मतांनी निवडून द्यावे,” असे त्यांनी आवाहन केले.
🔍 माघारीमागे कारणांबाबत चर्चा :
या माघारीमागे कोणालाही विश्वासात न घेता निर्णय घेण्यात आल्याची नाराजी शिवसैनिकांमध्ये आहे. मागील निवडणुकीतील पराभवानंतर शंकर वाडकर यांची राजकीय पकड कमजोर झाली होती, तसेच भाजप आमदारांच्या संपर्कामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मत पुरषोत्तम वाडकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
🌡️ राजकीय वातावरण तापले :
या घटनेनंतर बोरामणी व कासेगाव परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे.
“आमच्यातला नासका कांदा निघाला” अशा प्रतिक्रिया शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून, आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
👥 यावेळी उपस्थित :
दत्ता वाडकर, विक्रम मिटकरी, बालाजी ढेकळे, लकी जाधव, विश्वजीत चौगुले, प्रताप खारे आदी शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments