बोरामणी | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे :
बोरामणी जिल्हा परिषद गटातून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाकडून धनेश सुभाष अचलारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक प्रचाराला अधिकृत सुरुवात केली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत बोरामणी गटातील सर्वसामान्य मतदारांना थेट आवाहन केले.
यावेळी बोलताना धनेश अचलारे म्हणाले, “राजकारण हे सत्तेसाठी नसून सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी असले पाहिजे. गेली अनेक वर्षे मी समाजकार्याच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीत सहभागी होत आलो आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी मी सातत्याने संघर्ष केला आहे.”
शिवसेनाप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माजी गृहराज्यमंत्री माननीय सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनामुळेच सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“बोरामणी गटातील तमाम लाडक्या बहिणी, शेतकरी, युवक, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हाच माझा खरा भांडवल आहे. मला मिळणारे प्रत्येक मत हे बोरामणी गटाच्या विकासासाठीचे मत असेल,” असे ते म्हणाले.
आगामी काळात बोरामणी गटातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बोरामणी गटातील सर्व मतदारांनी विकास, विश्वास आणि प्रामाणिक नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहत मला येणाऱ्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे कळकळीचे आवाहन धनेश सुभाष आचलारे यांनी यावेळी केले.

0 Comments