Advertisement

Breaking News
Loading...

साईराज फायनान्स प्रकरणात 85 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक; सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय कडून ठेवीदारांना आवाहन...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर : सोलापूर शहरातील साईराज फायनान्सचे संचालक सचिन नामदेव भडंगे यांनी गुंतवणूकदारांची तब्बल 85 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत तक्रारदार पुनम धनंजय ढवळे (वय 40, रा. होमकर नगर, भवानी पेठ, सोलापूर) यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. चौकशीत असे निष्पन्न झाले की, सचिन भडंगे यांनी फिर्यादींचे मयत सासरे शामसुंदर ढवळे यांना साईराज फायनान्समध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून 79 लाख 48 हजार रुपये रोख व खात्यावरून स्वीकारले. संबंधित रकमेवर दरमहा 12 टक्के दराने 1 लाख 80 हजार रुपये परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

तसेच साक्षीदार नरेंद्र मोहनराव चव्हाण यांच्याकडूनही 6 लाख रुपये स्वीकारण्यात आले. एकूण 85 लाख 48 हजार रुपये घेतल्यानंतर मूळ रक्कम व परतावा न देता फसवणूक केल्याचे तपासात आढळून आले आहे.

या प्रकरणी जोडभावी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 138/2026 अन्वये भा.दं.वि. कलम 406, 420 तसेच महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय आस्थापनांमधील) हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक पेटकर करीत आहेत.

दरम्यान, सोलापूर शहरातील साईराज फायनान्समध्ये गुंतवणूक करून परतावा न मिळालेल्या ठेवीदारांनी आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर शहर येथे हजर राहून माहिती द्यावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांनी केले आहे.

पोलीस प्रशासनाने फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असेही स्पष्ट केले आहे.



Post a Comment

0 Comments