Advertisement

Breaking News
Loading...

रविवारचा चहा🍵भाग-१९२ खरं बोलणारा माणूस*

 


रविवारचा चहा🍵भाग-१९२

खरं बोलणारा माणूस

खरं बोलणारा माणूस आज कुठेच नीट बसत नाही, कारण तो जे आहे, तेच समोर ठेवतो. आणि लोकांना ते पचत नाही. घरात तो उध्दट वाटतो, कारण तो गप्प बसून सगळं सहन करीत नाही. ऑफिस मध्ये तो धोकादायक वाटतो, कारण तो खोट्या होकाराला होकार देत नाही. समाजात तो वेडा ठरतो, कारण तो गर्दी बरोबर वाहत नाही.

आजकाल शांत राहणं म्हणजे शहाणपण समजलं जातं, आणि प्रश्न विचारणं म्हणजे अडचण. खरं बोलणं लोकांना जखम करत नाही, तर त्यांचा मुखवटा काढून टाकतं. म्हणूनच सत्य अस्वस्थ करतं. खोटं गोड वाटतं म्हणून चालतं. पण तरीही खरं बोलणारा माणूस थांबत नाही, कारण त्याला स्वतःशी खोटं बोलता येत नाही. तो एकटा पडतो, पण हलका राहतो. सगळ्यांना आवडणं त्याचं ध्येय नसतं, तर स्वतःच्या नजरेत नीट दिसणं महत्वाचं असतं. म्हणूनच असा माणूस फिट बसत नसला, तरी आतून मजबूत असतो. कारण तो शांत नाही, तर प्रामाणिक असतो.

वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी, अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते. जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते, मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते, अनुभव, नाती, मान सन्मान, चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत आहे.

अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे. अपेक्षा ठेवायची असते तर, विश्वास कमवावा लागतो. संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना, स्वतः च्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास, बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही.

स्वतःची ओळख जर निर्माण करायची असेल ना तर चार चौघांमध्ये कौशल्य दाखवा. लायकी नाही. परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरू आहे. कारण आयुष्यात जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थिती शिवाय दुसरं कोण शिकवू शकत नाही.

पूर्णपणे ओळखू न शकलेल्या व्यक्तीला आयुष्यात कधीच जास्त जवळ करु नका. कोणाचा उद्देश काय असेल आणि कसा असेल हे वेळेवर कळण्यापेक्षा आधीच आपण माहीत करून घेतलेलं चांगल.

प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसं गोड आणि, खरं बोलणारी माणसं कडू वाटतात. कारण निसर्गाचा नियमच आहे की.. गोड साखर रोग निर्माण करते आणि कडुनिंब औषधीचं काम करते.

निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुखं दुःखात धावून जात असते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याप्रमाणे निंदकशिवय माणूस प्रगती करू शकत नाही.

माझ कसं होईल, हा प्रश्न मला कधी पडत नाही कारण सूर्य हा बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नाही. त्या प्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे, तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. धाडसी माणूस भीत नाही, आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.

जो फरक हजारो रूपये खर्च करून खाल्लेल्या औषधांनी पडत नसतो, तोच फरक दहा मिनिटं ज्यांच्याशी बोलून पडतो ना, तीच आपली माणसं असतात. जगणं तेव्हा सुंदर असतं जेव्हा इतरांपेक्षा आपलं चांगल आहे असं वाटतं. अंदाज मनाची कल्पना अनुभव जीवनातील सत्य. नातं हे हृदयाशी असलं पाहिजे. रक्ताशी नातं तर मच्छरांसोबत पण असतं.
केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षाही जास्त महत्वाची आहे. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला इतरांना पटवून देण्याची गरज नसते.

स्वतःला मर्यादे पलीकडे महत्त्व देणारी माणसे कुणाशीच जुळवून घेऊ शकत नाहीत; अशी माणसे फक्त स्वतःसाठी जगतात, स्वतःलाचं कुरवाळत बसतात अन् कालांतराने इतरांच्या आयुष्यातून अस्तित्वशून्य होतात.
कानात भरलेले शब्दांचे विष हृदयात राहणारे नाते नष्ट करते. समोरच्याला आपली कदर नसताना आपण त्याच्याशी चांगले वागणे हा आपला मूर्खपणा आहे..!

प्रा.दिलीप आनंदराव जाधव
                   सचिव
सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली.



Post a Comment

0 Comments