मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | वृत्तांकन डॉ राजदत्त रासोलगीकर:
अलीकडे फास्ट फूड खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बेकरी पदार्थ तसेच बाहेरील गाड्यांवर मिळणाऱ्या चायनीज पदार्थांमध्ये वापरले जाणारे कृत्रिम रंग आरोग्यास अपायकारक ठरत आहेत. अशा पदार्थांचे सेवन टाळणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी समाजात अन्न भेसळीविषयी जनजागृती करावी, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे सहसचिव प्रा. सुबोध कोळी यांनी केले.
ते अन्न व औषध प्रशासन सोलापूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि मंद्रूप येथील संतोष पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भेसळयुक्त अन्न कसे ओळखावे?’ या विषयावरील कार्यशाळेत मार्गदर्शन करत होते.
यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उमेश भुसे, अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. रामानंद स्वामी, अन्न विश्लेषक श्रीनिवास जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप यांच्यासह विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात संस्थेचे विश्वस्त नागेश बिराजदार यांनी सांगितले की, बाजारातून आणला जाणारा भाजीपाला तसेच दुकानातून खरेदी केलेले अनेक अन्नपदार्थ विषासमान ठरत आहेत. त्यामुळे किमान तपासणी करूनच अन्नपदार्थांचा वापर करावा व स्वतःचे आरोग्य जपावे.
केकमध्ये रंग वापरण्यास परवानगी नाही:
अन्न व औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उमेश भुसे म्हणाले, सध्या घरोघरी वाढदिवस साजरे करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावेळी आणला जाणारा केक आकर्षक दिसावा म्हणून मोठ्या प्रमाणात कृत्रिम रंग वापरले जातात. मात्र, केकमध्ये रंग वापरण्यास परवानगीच नाही. तसेच पिण्याच्या पाण्याचा टीडीएस महत्त्वाचा असून फिल्टरचे पाणी सर्वच वेळा शुद्ध असेल असे नाही. त्यामुळे टीडीएस तपासूनच पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, हे पाहावे.
दुधातील भेसळ अशी ओळखा:
दुधात होणाऱ्या भेसळीचे प्रात्यक्षिक यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी करून दाखवले. दुधाचा ठिपका भिंतीवर टाकल्यानंतर तो हळूहळू खाली येत असेल व डाग राहात असेल, तर दूध शुद्ध असल्याचे समजावे. मात्र, पाण्यासारखा वेगाने वाहून गेला तर त्यात भेसळ असल्याची शक्यता असते. काही ठिकाणी केमिकलचा वापर करून बनवलेले दूध कंपन्यांना पुरवले जात असल्याच्या घटना सोलापूर जिल्ह्यातही घडल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
वनस्पतीशास्त्रावरील पुस्तकाचे प्रकाशन:
यावेळी प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप, प्रा. डॉ. सोनाली रणदिवे व प्रा. डॉ. सविता सातपुते यांनी लिहिलेल्या वनस्पतीशास्त्र विषयावरील अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. स्वागतपर मनोगत प्रा. डॉ. जवाहर मोरे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. के. यू. गरड यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रीती बगले हिने केले, तर आभार प्रा. डॉ. बी. एस. कोरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. आर. यू. डांगे यांनी विशेष परिश्रम घेतले.



0 Comments