सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर : स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी धडाकेबाज कारवाई करत मागील चार वर्षांपासून फरार असलेल्या ‘मोका’सह अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपीला अटक केली आहे. कुर्डु (ता. माढा) परिसरात दहशत माजवणारा कुख्यात गुन्हेगार कुकण उर्फ कृष्णा काळुराम शिंदे याला नालासोपारा (वसई-विरार) येथून १२ तास सापळा लावून शिताफीने पकडण्यात आले.
मा. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांना आरोपीविरुद्ध गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सामान्य नागरिकांना वेठीस धरून लुटमार करणे, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळणे अशा प्रकारच्या कृत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आदेश दिले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कुर्डु येथून पळून जाऊन वसई-विरार परिसरात राहत असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणातून तो मिरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालय हद्दीतील पेल्हार पोलीस ठाणे क्षेत्रातील धानीवबाग, नालासोपारा येथे भाड्याने राहत असल्याची खात्री झाली.
त्यासाठी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत सी.आय.यू. युनिट-४ ची मदत घेण्यात आली. संयुक्त कारवाईत १२ तास सापळा लावून आरोपीला अटक करण्यात आली.
गंभीर गुन्ह्यांची मालिका:
सदर आरोपीवर खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, सरकारी कामात अडथळा, शारीरिक इजा इत्यादी स्वरूपाचे एकूण १९ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातील 2021 सालचा भादंवि कलम 395 व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत गुन्हा, तसेच 2025 सालचा बीएनएस कलम 140, 304(2), 351(3) यांचा समावेश आहे. याशिवाय 2009 ते 2023 या कालावधीत कुर्डुवाडी, टेंभुर्णी, बार्शी, वैराग तसेच कर्नाटक राज्यातील चडचण येथे दरोडा (कलम 395), खून (302), खुनाचा प्रयत्न (307), जबरी चोरी (394, 397) आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपी दोन ‘मोका’ गुन्ह्यांत मागील चार वर्षांपासून रेकॉर्डवरील पाहिजे आरोपी होता.
पुढील कारवाई:
अटक करण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासासाठी कुर्डुवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
उल्लेखनीय कामगिरी:
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहा. पोलीस अधीक्षक श्रीमती अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, श्रेणी पोसई श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ सलीम बागवान, रवि माने, आबा मुंढे, व्यंकटेश मोरे (सायबर पो.ठा.), मपोहेकॉ अश्विनी गोटे, पोकॉ सुरज रामगुडे, विनायक घोरपडे, अन्वर अत्तार, मनोज राठोड, चापोना समीर शेख यांनी सहभाग घेतला.
तसेच सी.आय.यू. युनिट-४, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय येथील पोलीस निरीक्षक बडाख, सहाय्यक पोलीस अधिकारी प्रशांत गांगुर्डे, दत्ता सरख, तसेच पोलीस अंमलदार शिवाजी पाटील, संदीप शेरमले, रविंद्र कांबळे, धनंजय चौधरी यांनी मोलाची मदत केली.


0 Comments