Advertisement

Breaking News
Loading...

मोहोळ तालुक्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास...

 


मोहोळ|हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी : मोहोळ तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश श्री. डी. एन. सुरवसे (जिल्हा न्यायाधीश-३) यांनी दिला.

या प्रकरणातील आरोपी लक्ष्मण विठ्ठल शिंदे (वय ३०, रा. ता. मोहोळ) याने पीडित मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेत दुपारी सुमारास तिच्या घरी जाऊन घराला आतून कडी लावून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच ही घटना कोणास सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. धमकीमुळे पीडितेने सुरुवातीला ही बाब कोणास सांगितली नाही.

घटनेनंतर काही दिवसांनी पीडितेला उलट्या व डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. आजीने चौकशी केल्यानंतर पीडितेने संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर मोहोळ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली.

तपास अधिकारी एपीआय राठोड यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. विशेष न्यायालयातील सुनावणीदरम्यान पीडिता, तिची आजी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. तसेच पीडिता, तिच्या गर्भाचा व आरोपीचा डीएनए अहवाल जुळल्याने गुन्हा सिद्ध झाला.

सरकार पक्षातर्फे ॲड. शीतल डोके व  ॲड. पी. एस. जन्नू यांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपीस भा.दं.वि. कलम ३७६(२) (एन) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) कलम ४ व ५ अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व १०,००० रुपयांचा दंड, तसेच भा.दं.वि. कलम ५०४ व ५०६ अंतर्गत १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

या प्रकरणात कोर्ट पैरवीसाठी पोलीस कॉन्स्टेबल राजू पवार व लेडी कॉन्स्टेबल काळे यांनी सहकार्य केले.



Post a Comment

0 Comments