मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहिले पाहिजे. स्पर्धेत अखेरच्या क्षणीही संधी मिळू शकते. त्यामुळे अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते सचिन वायकुळे यांनी केले.
ते मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने आयोजित ‘थोडे थांबा… यश तुमची वाट पाहतंय’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे सचिव एम. डी. कमळे होते. यावेळी प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप प्रमुख उपस्थित होते.
सचिन वायकुळे पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षांच्या प्रवासात अपयश हे अनेक वेळा येते. मात्र शेवटचा अटेम्प्टसुद्धा आपल्याला क्लास-वन अधिकारी बनवू शकतो. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वास या चार गोष्टी अंगी बाणवल्यास यश दूर राहत नाही. त्यांनी चंद्रावर उतरणारे पहिले मानव नील आर्मस्ट्रॉंग यांच्या यशकथेचा तसेच दोन्ही पाय नसतानाही ऑलिम्पिकमध्ये धावण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या ऑस्कर पिस्टोरियस यांच्या संघर्षमय प्रवासाचा प्रेरणादायी दाखला दिला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना एम. डी. कमळे म्हणाले की, विद्यार्थी दशेपासूनच स्पर्धा परीक्षांची जाणीव होणे आवश्यक आहे. सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्येक विद्यार्थ्याने पाहिले पाहिजे. स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी केलेले प्रयत्न शेवटी यश मिळवून देतात.
प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक प्रा. पी. बी. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. एम. सी. हजारे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी माने यांनी केले तर प्रा. डॉ. व्ही. एन. गायकवाड यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments