बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
शिवरायांना लहानपणापासूनच राजमाता जिजाऊ यांच्याकडून संस्कारांचे बाळकडू मिळाले. शिस्त, नीतीमत्ता आणि स्वराज्याची प्रेरणा जिजाऊंनी त्यांच्या मनावर कोरली. शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांसह सर्व समाजघटकांना सोबत घेत स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांच्या राज्यात प्रत्येकाला — “हे माझे राज्य आहे” — अशी आत्मीयता वाटत होती.
मेणापेक्षा मऊ आणि वज्रापेक्षा कठीण अशी त्यांची नीती होती. स्त्रियांचा सन्मान, न्यायनिष्ठा आणि प्रजेसाठी असलेली कळकळ यामुळेच आजही शिवाजी महाराज आपलेच राजे वाटतात.
गुणग्राहकता’ — शिवरायांचा वैशिष्ट्यपूर्ण गुण:
स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही गुण असतो, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. प्रत्येकाला योग्य तो मानसन्मान देणे ही त्यांची कार्यपद्धती होती.
एक प्रसंग सांगितला जातो—
एकदा महाराज जंगलातून फिरत असताना मावळ्यांपासून दूर गेले. दुपारची वेळ, भूक लागलेली. त्यांनी एका झोपडीचा दरवाजा ठोठावला. आत एक वृद्ध स्त्री होती. तिने त्यांना ओळखले नाही; पण दारी आलेला अतिथी भुकेला आहे, असे समजून तिने गरम भाकरी आणि पिठलं वाढले.
महाराजांनी भाकरीचा मधला घास तोडला आणि हात पोळला. तेव्हा ती वृद्ध स्त्री म्हणाली, “तू त्या शिवाजीसारखाच चुकतो आहेस!”
महाराजांनी आश्चर्याने विचारले, “कसं काय?”
ती म्हणाली, “अरे, मुख्य राज्य जिंकायचं असेल तर आधी कडेकडची राज्यं जिंकली पाहिजेत. मधल्या भागावर थेट हल्ला करून चालत नाही. भाकरीही आधी कडेकडून खायची असते; म्हणजे हात पोळत नाही.”
या साध्या प्रसंगातून महाराजांना रणनीतीची मोलाची शिकवण मिळाली.
कर्तृत्वाची कदर करणारे राजे:
शिवाजी महाराजांच्या दरबारात वडार समाजातील कुशल अभियंता हिरोजी इटळकर यांना अभेद्य रायगड किल्ला उभारण्याची जबाबदारी देण्यात आली. दिवस-रात्र परिश्रम करून त्यांनी निश्चित वेळेत किल्ला पूर्ण केला. या किल्ल्याची रचना इतकी वैशिष्ट्यपूर्ण होती की एका दिशेने उच्चारलेला शब्द सर्वदूर प्रतिध्वनित होत असे.
किल्ल्याची पाहणी करताना महाराज अत्यंत आनंदी झाले. त्यांनी हिरोजींना विचारले, “वतनदारी, जमीन, सोने—जे हवे ते माग.”
परंतु स्वाभिमानी हिरोजी इटळकर यांनी संपत्ती न मागता फक्त एवढीच विनंती केली की, रायगडाच्या पायथ्याशी त्यांचे नाव कोरले जावे. महाराजांनी ती विनंती मान्य केली.
“सेवेसी ठायी तत्पर — हिरोजी इटळकर” असे शब्द कोरले गेले. आजही रायगडावर जाणारे भाविक त्या पायरीचे दर्शन घेऊनच पुढे जातात.
एकंदरीत, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्व, आत्मविश्वास आणि दूरदृष्टीच्या बळावर स्वराज्याची स्थापना केली आणि प्रजेला न्यायनिष्ठ, नीतीमूल्यांवर आधारित राज्य दिले.
चला, त्यांच्या कार्याचा जागर करू या...
सुराज्य निर्मितीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करू या...
- रवी देवकर, सोलापूर
.jpeg)

0 Comments