बार्शी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दि. २८ फेब्रुवारी २०२६
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषणासंदर्भातील निर्देशांनुसार तसेच शासनाच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सोलापूर ग्रामीण पोलीस यांच्या वतीने बार्शी शहरात विशेष मोहीम राबविण्यात आली.
मा. श्री. अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २८/०२/२०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० या वेळेत बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत अनधिकृत भोंगे उतरविण्याची कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत मा. श्री. अशोक सायकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी उपविभाग, श्री. बालाजी कुकडे, पोलीस निरीक्षक, बार्शी शहर यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला.
कारवाईची ठिकाणे:
बारंगुळे प्लॉट, मंगळवार पेठ, खाजा नगर (४२२), अमन चौक, एकविरा आई चौक या मिश्रवस्ती भागातील मस्जिद, दर्गा, मदरसा, मंदिर व इतर धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे काढण्यात आले.
कारवाईचा आढावा:
११ मस्जिद तपासण्यात आल्या
त्यापैकी ८ मस्जिदींवरील १४ भोंगे उतरवले...
५ मंदिरांवरील ८ भोंगे काढले...
👉 एकूण २२ भोंगे जप्त / उतरविण्यात आले
सदर कारवाईदरम्यान संबंधित धार्मिक स्थळांच्या ट्रस्टींना सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषणासंबंधी मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देण्यात आली. ध्वनीवर्धक यंत्र वापरण्यापूर्वी वैध परवाना घेणे व आवाजाची मर्यादा राखणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. स्पीकर बॉक्स धार्मिक स्थळाच्या आतमध्येच बसवावेत, अशी समजही देण्यात आली.
ही संपूर्ण मोहीम शांततापूर्ण वातावरणात पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. सर्व समाजघटकांनी प्रशासनाला सहकार्य केले.
पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी आवाहन करताना सांगितले की, "ध्वनीप्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करावे. कोणतेही ध्वनीवर्धक यंत्र वापरण्यापूर्वी आवश्यक ती वैध परवानगी घेणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल."
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अशीच मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


0 Comments