मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लू अण्णा कांबळे :
उजनी धरण येथून भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेले पाणी कनार्टक सरकारने बांधलेल्या उमराणी-सादेपूर बंधारा येथे अडविण्यात येत असल्याने सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा २३ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
माजी सभापती, कृषि, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती, जिल्हा परिषद सोलापूर अप्पाराव गोपाळराव कोरे यांनी मा. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. मात्र ते पाणी उमराणी-सादेपूर बंधाऱ्यापर्यंतच अडविण्यात आले असून औज, चिंचपूर, बरूर व कोर्सेगाव बंधाऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही.
मंद्रूप, कुरघोट, टाकळी, नांदणी, औज आदी गावे भीमा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या गावांतील शेतकऱ्यांनी शेतीसाठी नदीवरून पाईपलाईनद्वारे पाणी घेतले आहे. मात्र पाण्याअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून जनावरांनाही पाण्याची टंचाई भासत आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, उमराणी-सादेपूर बंधाऱ्यावर अंदाजे ०.७५ टीएमसी पाणी उपलब्ध असून त्यापैकी किमान २५ टक्के पाणी जरी सोडले, तरी संबंधित गावांना शेती, पिण्याचे पाणी व जनावरांसाठी दिलासा मिळू शकतो.
या मागणीसंदर्भात विलास लोकरे, आशिफ शेख, जिल्हाध्यक्ष अख्तरताज पाटील, अप्पाराव कोरे, तोहिद पाटील आदींच्या सह्या असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सोलापूर–विजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


0 Comments