सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : एकीकडे गुढीपाडव्याचा उत्साह, तर दुसरीकडे निसर्गाचा प्रचंड कोप — अशा दुहेरी परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सध्या सापडला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने आणि गारपिटीने शेतीचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.
सांगोला व दक्षिण सोलापुरात सर्वाधिक फटका:
सांगोला तालुक्यातील जुनोनी, जुजारपूर, तिप्पेहळी, करांडेवाडी, कोळे या भागांत तब्बल दोन तास गारांचा तुफानी मारा झाला. द्राक्ष बागांतील मणी फुटून बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. केशर आंब्याचा मोहर व कैऱ्यांचा खच झाडाखाली पडला आहे.
दक्षिण सोलापूर आणि बार्शी तालुक्यातही परिस्थिती गंभीर असून, काढणीसाठी ठेवलेला गहू व ज्वारी पावसात भिजून काळवंडला आहे.
हातातोंडाशी आलेला घास हिरावला:
द्राक्ष उत्पादकांनी लाखो रुपये खर्च करून जोपासलेल्या बागा काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्या. ऐन काढणीला आलेला गहू आडवा झाल्याने मळणीचे मोठे संकट निर्माण झाले आहे.
या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे वर्षभराचे नियोजन कोलमडले असून, आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.



0 Comments