माळकवठा | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठा येथे एका तरुणावर स्टेटसच्या कारणावरून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मादण्णा बिळेनसिद्ध वडेयार (वय 20, रा. आरकेरी, ता. कोटा, जि. विजापूर, राज्य कर्नाटक) यांना त्यांच्या ओळखीतील काही जणांनी संगनमत करून जबरदस्तीने माळकवठा येथे नेले. दिनांक 23 मार्च रोजी दुपारी सुमारे 3:45 वाजता ही घटना घडली.
माळकवठा येथील सतीश हनुमंत थोरात (पिंटू) यांच्या शेतात नेल्यानंतर, “माझ्या बहिणीचे स्टेटस का ठेवले?” या कारणावरून वाद निर्माण झाला. यावेळी सतीश थोरात याने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी इतर आरोपींनीही “याला जिवंत ठेवू नका” असे म्हणत मारहाणीला उत्तेजन दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी सतीश थोरात, सिद्राम बिरादार, प्रकाश सुसलादी आणि एका अनोळखी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद 28 मार्च रोजी पहाटे 5:27 वाजता करण्यात आली असून, तपास पोलीस उपनिरीक्षक डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments