सोलापूर ग्रामीण | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : नागरिकांना विषमुक्त आणि सेंद्रिय अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत तसेच शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळावी या उद्देशाने सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या पुढाकारातून सेंद्रिय आठवडी बाजार भरविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दर रविवारी सोलापूर ग्रामीण पोलीस पेट्रोल पंप परिसरात हा बाजार भरत असून नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पोलीस अधीक्षक मा. अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील विविध भागातील सेंद्रिय शेती करणारे शेतकरी थेट आपल्या शेतातून ताज्या वस्तू ग्राहकांपर्यंत घेऊन येत आहेत. यामुळे ग्राहकांना रसायनमुक्त, ताजे आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होत आहेत, तर शेतकऱ्यांनाही योग्य दर मिळण्यास मदत होत आहे.
या बाजारात ताजा भाजीपाला, विविध फळे, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर पूर्णपणे सेंद्रिय आणि विषमुक्त उत्पादने उपलब्ध असतात. त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैलीकडे वाटचाल करणाऱ्या नागरिकांसाठी हा बाजार एक उत्तम पर्याय ठरत आहे.
दर रविवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत सोलापूर ग्रामीण पोलीस पेट्रोल पंप परिसरात हा बाजार भरत असून नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन सेंद्रिय अन्नाचा स्वीकार करावा आणि शेतकऱ्यांना थेट पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
निरोगी जीवनासाठी सेंद्रिय अन्नाची निवड करूया, असा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.


0 Comments