कासेगाव | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे शेतातील पाण्याच्या पाइपलाईनच्या वादातून एका शेतकऱ्यावर कुदळ व खोऱ्याने हल्ला करून गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद भरत हेडे (वय ३७, रा. कासेगाव, ता. सोलापूर) हे शेती व खडी क्रेशर मशिनवर चालक म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कासेगाव येथील शेतासाठी सामाईक विहिरीतून पाण्याची पाइपलाईन करण्यात आलेली आहे.
दि. ७ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता गोविंद भरत हे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी मोटार सुरू करत असताना पाइपलाईन फुटल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी चुलत भाऊ एकनाथ पांडुरंग हेडे यांना फोन करून विचारणा केली असता फोनवरून शिवीगाळ झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर सायंकाळी सुमारे ६.३० वाजता गोविंद भरत हेडे हे शेताच्या कडेला पाइपलाईनजवळ गेले असता तेथे पांडुरंग लक्ष्मण हेडे व त्यांचा मुलगा एकनाथ पांडुरंग हेडे पाइपलाईन दुरुस्त करत होते. यावेळी वाद झाल्यानंतर पांडुरंग हेडे यांनी गोविंद भरत यांना पाठीमागून पकडले, तर एकनाथ हेडे यांनी हातातील कुदळ (बेडगे) डोक्यात मारली. त्यानंतर पांडुरंग हेडे यांनी हातातील खोऱ्याने डोक्यावर वार करून त्यांना जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच दोघांनी मिळून कुदळ व खोऱ्याच्या दांडक्याने पाठ, हात व पायावर मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत गोविंद हेडे हे बेशुद्ध पडले होते. त्यांची पत्नी कांचन यांनी त्यांना शुद्धीवर आणून रिक्षातून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी पाठविल्यानंतर त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दि. ११ मार्च रोजी त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर त्यांनी तक्रार दिली.
या तक्रारीवरून पांडुरंग लक्ष्मण हेडे व एकनाथ पांडुरंग हेडे (दोघे रा. कासेगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम 118(1), 352, 351(2), 351(4) व 3(5) अन्वये सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
यासंदर्भात फिर्यादी गोविंद हेडे यांनी 'हॅलो रिपोर्टर न्यूज' सोबत बोलताना घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे.


0 Comments