मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा सर्वत्र बोलबाला असताना, शहरालगतच्या मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे मात्र चिमुकले हरिपाठ, भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून ‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’ वाढवत असल्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे. युवकांच्या पुढाकारातून गुढी पाडव्यापासून अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण सुरू झाले असून, यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे.
विधायक कृतीशीलता आणि सामाजिक एकात्मता वाढवण्याच्या उद्देशाने जय हनुमान भजनी मंडळाने गावात अखंड हरिनाम सप्ताह, शिवलीलामृत पारायण आणि स्वच्छता मोहिम राबवण्याचा निर्धार केला. ज्येष्ठ नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने राबवला जात आहे. या कालावधीत नगर, पुणे आणि मराठवाड्यातील अनेक नामांकित कीर्तनकारांनी मंद्रूपमध्ये हजेरी लावली आहे. यंदाही प्रसिद्ध कीर्तनकारांची सेवा आयोजित करण्यात आली आहे.
सप्ताहानिमित्त भाविकांसाठी दररोज महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, उन्हाळ्यातील रक्तटंचाई लक्षात घेऊन शनिवारी (दि. २१) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सोमवारी (दि. २३) सकाळी गावातून ग्रंथाची नगरप्रदक्षिणा दिंडी काढण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष सुभाष वाघमोडे व सुनील लाड यांनी दिली.
चिमुकल्यांचा हरिपाठाकडे ओढा:
कोविडनंतर लहान मुलांमध्ये मोबाईलचा वाढता वापर कमी करण्यासाठी जय हनुमान भजनी मंडळाने दररोज सायंकाळी हरिपाठ सुरू केला. सुरुवातीला केवळ चार-पाच मुलांनी सुरुवात केली होती; मात्र हरिपाठामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून आल्याने इतर पालकांनीही आपल्या मुलांना यात सहभागी करून घेतले.
आजघडीला दररोज ४० ते ५० चिमुकले मधल्या मारुती मंदिरात हरिपाठ, भजन आणि गौळणामध्ये तल्लीन होताना दिसतात. या उपक्रमामुळे मुलांना संतवाङ्मयाची गोडी लागली असून, मोबाईलपासून दूर राहण्याची सवयही लागली आहे. ‘एआय’च्या काळात ही चिमुकली पिढी स्वतःचे ‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’ विकसित करत असल्याचे समाधानकारक चित्र आहे.
या उपक्रमासाठी बबन देशमाने, ओंकार झेंडेकर, सुरेश देशमुख, संजय केमकर, विनायक कोरे, आबा मोटे, मुकेश देविदास आदींनी विशेष पुढाकार घेतला आहे.
मान्यवर कीर्तनकारांची मांदियाळी...
अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त १९ ते २२ दरम्यान मधल्या मारुती मंदिरात विविध कीर्तन व प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वारकरी संप्रदायातील मान्यवर सहभागी होणार आहेत.
अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे, जिल्हाध्यक्ष संजय महाराज पाटील, सुनेश नाईकवाडे महाराज (बीड), दत्तात्रय क्षीरसागर महाराज (उळे), ज्ञानेश्वरी घाडगे महाराज (अकलूज), संस्कार खंडागळे महाराज (पंढरपूर) यांची कीर्तन सेवा होणार आहे. तसेच वैष्णवी भगरे (अकोले), भीमा भोसले (कामती), बाळू पवार (गुंजेगाव), दशरथ खरात (मंद्रूप) यांची प्रवचनेही आयोजित करण्यात आली आहेत.
एकीकडे एआयचे युग वेगाने पुढे जात असताना, मंद्रूपमधील ही चिमुकली पिढी अध्यात्माच्या माध्यमातून संस्कार आणि एकात्मतेचा सुंदर वारसा जपत असल्याचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.


0 Comments